सोने हा विक्रीचा शेवटचा पर्याय आहे. सोन्याकडे बघण्याचा भारतीय लोकांचा दृष्टीकोनही वेगळा आहे. बाकी काही होवो, पण सोने विकायची कुणावर वेळ येऊ नये, असा वाक्प्रचार आहे. त्यामुळे आपली सामाजिक पत सांभाळण्यासाठी आपण सोने विकायला गेलो तर ज्याप्रमाणे कॉलेजातील तरुण मुले पानपट्टीवर जाताना आपल्याला कुणी बघत तर नाहीत ना, अशा चोरटेपणाने जातात तशी अवस्था होते. दागिना मोडायला गेल्यास ओळखीच्या कुणी बघितले तर माझी सामाजिक पत ढासळेल, अशी पुरुषांची अवस्था होते. सोन्याला मनात व विचारांमध्ये आपण इतके जवळिकीचे स्थान दिले आहे, की ते वन-वे-ट्रॅफिक झाले आहे. गुंतवणुकीमध्ये असे म्हणतात, की एक प्रवेशद्वार असते आणि एक निर्गमन दार असते. सोन्याबाबत मात्र केवळ प्रवेशद्वार आहे, बाहेर पडण्याचे दार नाही. आपल्याकडे विवाह केल्यावर घटस्फोट होणे फार दुर्मीळ असते तसेच सोन्याशी एकदा संबंध जुळला, की ते विकून त्यापासून फारकत घेणे अवघड असते. सोने विकणे हा मार्ग खडतर व शेवटचा पर्याय असून अन्य मार्ग खुंटले तरच तो वापरावा लागतो.
सोने महाग होते. लोक विचारतात ते स्वस्त कधी होईल? पण हा प्रश्न विचारुन ते स्वतःसाठीच वाईट विचार करत असतात. वर्षानुवर्षे तुम्ही दोन ग्रॅम, पाच ग्रॅम करत, वेगवेगळ्या दरांत खरेदी करत घरात अर्धा-एक किलो सोने साठवलेले असते. त्याच्याबद्दल तुमचे विचार काय तर सोने स्वस्त कधी होईल? तसे झाले तर तुमची संपत्ती घटणार नाही का? तुम्ही आता दहा-वीस ग्रॅम सोने घ्यायला आला आहात आणि तुमच्या घरात आधीपासून वेगवेगळ्या भावात घेतलेले एक किलो सोने साठवलेले आहे. मग सोने स्वस्त झाले तर त्याची किंमत जास्त भरेल की आता घेत असलेल्या २० ग्रॅममध्ये पैसे जास्त वाचतील? त्यामुळे सोने स्वस्त होईल का, असा विचार कुणीच करु नये. सोने स्वस्त झाले तर प्रत्येकाचे आर्थिक आरोग्य बिघडेल एवढे लक्षात ठेवा. सोने ही एकच वस्तू आहे जी व्यवहारातील चलनांच्या खरेदीच्या ताकदीला पर्याय मिळवून देत असते. आता ही खरेदीची ताकद खरोखरच बदलली जाते का?
मला कोरोना महासाथीच्या काळात उत्तर प्रदेशमधून एका ८० वर्षे वयाच्या वृद्ध गृहस्थांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या पोस्ट वाचल्या होत्या. ते म्हणत होते, की तुमचा सोन्याबाबत खूप अभ्यास आहे. त्यावर मी म्हणालो, ‘‘तुम्ही ८० वर्षांचे आहात, सराफी व्यवसायात आहात, खूप अनुभवी आहात. त्यामुळे तुमचाच अभ्यास माझ्याहून अधिक असेल. तर तुम्हीच मला काही कानमंत्र द्या.’’ त्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही लोकांना सोने खरेदी करायला सांगताना काय मार्गदर्शक सूचना देता?’’ मी उत्तर दिले, ‘‘अशा काही विशेष सूचना देत नाही. सध्या सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही किंवा सध्याचा सोन्याचा भाव वाजवी वाटतोय, बऱ्याच दिवसांत तो वाढलेला नाही, नजिकच्या काळात वाढू शकेल वगैरे नेहमीच्याच सूचना करत असतो; शिवाय जागतिक स्थितीचे ठोकताळेही सांगतो.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘माझ्यासाठी तुम्ही तुमच्या वाचकांना, ग्राहकांना एक गोष्ट समजावून सांगा. ती म्हणजे प्रत्येकाने त्याच्या आयुष्यात त्याच्या निवृत्तीनंतरच्या उर्वरित काळाचा एक कच्चा हिशेब आधीच मांडावा. प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येक प्रदेशातील जीवनमान यानुसार हा काळ कमी-अधिक होऊ शकेल, पण ढोबळमानाने मनुष्य साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्याला आणखी किमान २०-२५ वर्षे जगण्याची आकांक्षा असते. ती वर्षे गुणिले बारा महिने गुणिले दहा ग्रॅम इतके सोने तुमच्याकडे निवृत्तीच्या दिवशी असायलाच हवे म्हणजे नंतरच्या काळात तुम्हाला कुणापुढेही हात पसरायला लागणार नाही. तुमच्या मुलांनी नोकरी केली नाही तरी चालेल. तुम्ही सहाजणांचे कुटुंब उत्तम व परिपूर्णरीत्या चालवू शकाल. अर्थात मी त्यात चैनबाज राहणीची अपेक्षा करत नाही.’’
ते म्हणाले, ‘‘माझे वय सध्या ८० आहे आणि मी गेले ५०-६० वर्षे निरीक्षण करत आलोय. त्यानुसार १० ग्रॅम सोन्याची किंमत ही त्या त्या काळातील एक महिन्याच्या खर्चाइतकी असते. ज्या काळात सोने ४०० रुपये प्रति १० ग्रॅम होते, त्यावेळी तेवढ्या रकमेत महिन्याचा संसार भागायचा, ज्या काळात सोने १००० रुपये प्रति १० ग्रॅम झाले तेव्हाही त्या रकमेत सहा माणसांच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च वाजवी म्हणजे हजार-बाराशे रुपये होता. कोरोनाच्या काळात सोन्याचा भाव ४२,००० ते ४५,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तेवढ्या रकमेत सहाजणांच्या कुटुंबाचा महिन्याचा चरितार्थ सहज व एक दर्जा टिकवून चालू शकतो. मुलांनी काही व्यवसाय केला नाही तरी वडील त्यांच्या उर्वरित जीवनकाळातही मुलांना पोसू शकतात.’’
हे गणित आपल्याला पटत असेल तर आपण नक्कीच विचारणार, की आता तर सोने भाव १० ग्रॅमला ६० हजार रुपये आहे आणि माझे वय २५ वर्षे आहे. मला साठीला अजून ३५ वर्षे आहेत. त्यानंतरच्या २५ वर्षांसाठी मला तीन किलो सोने साठवायचे आहे. कसे शक्य होणार? तर त्याचे उत्तर आहे, की तुम्ही एक हिशेब करुन दर महिन्याला सहजतेने किती रुपयांची गुंतवणूक करु शकेन, याचा विचार करायचा. अर्थात ही रक्कम तुम्ही निव्वळ सोने खरेदीतच गुंतवावी असे नाही. सोन्यामध्ये आता अनेक पर्याय आले आहेत. उदाहरणार्थ, गोल्ड इटीएफ ज्याला व्यवहार खर्च अगदी कमी आहे. तुम्ही पटकन् पैसे गुंतवू शकता तसेच काढू शकता. पण आपल्याला पैसे काढायचे नाहीत. सोने विकायची वेळ यायला नको. अगदी महत्त्वाच्या वेळेला म्हणजे निवृत्तीनंतर गरज पडली तरच. जर तुम्ही अशी योजनाबद्ध गुंतवणूक करत गेलात तर तुम्हाला कुठल्याही युलिप किंवा बाजारपेठेशी संबंधित अनेक निवृत्ती योजनांचा विचार करायची गरजच पडणार नाही, कारण तुमच्या हातात असेल ते शाश्वत सोने. ज्या प्रमाणात महागाई वाढेल, त्या प्रमाणात सोन्याचा भाव वाढेल आणि मला तेवढे पैसे तेव्हा पुरतील का याचा विचार करण्याची वेळही येणार नाही, कारण मी त्यावेळेस माझ्याकडे साठवलेल्या सोन्यातून दर महिन्याला दहा ग्रॅम विकेन आणि माझा चरितार्थ चालवेन.
सोन्याच्या भावावर कशाकशाचे परिणाम होतात तर अनेक गोष्टींचे. त्यातील काही परिणाम तर अतार्किकही असतात. अशा अतार्किक परिणामांमुळे जितक्या लवकर सोने वधारलेले असते तितक्याच लवकर त्याचा भाव खालीही येतो. लोक म्हणतात सट्टा चालू आहे नुसता, पण अशी विधाने विचार न करता किंवा कारणमीमांसा न करता केली जातात. सोन्याच्या भावाचा संबंध चलनवाढ किंवा महागाईशी आहे. त्या त्या काळात लागणारा खर्च किंवा जीवनमान चालवण्यासाठीचा खर्च तुम्हाला चलनाच्या तुलनेत सोनेच बदलून देत असते. मग चलनवाढ कोणकोणत्या कारणाने होऊ शकते याचा अभ्यास केला आणि चलनवाढ नक्की होणार असेल तर सोन्याची किंमतही वाढणे स्वाभाविक आहे. मी बऱ्याचजणांना सांगतो, की वस्तूच्या किंमती वाढल्या तर त्याबद्दल खेद का करता? वस्तू निर्माण करणाऱ्यालाही वाटत असेलच ना, की मला दोन पैसे जास्त मिळावेत. त्याचा मूलभूत खर्च (इनपुट कॉस्ट) वाढत असेल तर त्यालाही वस्तूची किंमत वाढवावी लागणारच ना? म्हणजे चलनवाढ होणारच आहे आणि सोन्याची किंमत वाढणारच आहे. आता ती किती वाढेल? याचा विचार तुम्ही रुपयांत न करता टक्क्यांमध्ये करा. बँकेत गेल्यावर गेल्यावर तुम्ही म्हणता का, की गेल्या वर्षी बँकेने मला एक लाख रुपयांवर एक हजार रुपये व्याज दिले होते. यंदा महागाईचा दर ८ टक्के आहे म्हणून माझ्या रकमेवरचे व्याज मला हजारांच्या जागी बाराशे रुपये मिळाले पाहिजे. तसे सोन्याबाबत विचारुन चालत नाही. सोन्याची वाढ टक्क्यांत होणार असेल तर ती कधी स्थिर रुपयांत होणार नाही आणि झालेली वाढ आवाक्याच्या बाहेर गेली का? अमर्यादित वाढली का? म्हणूनच रुपयांपेक्षा टक्क्यांमधील वाढ विचारात घ्या.
महागाई कशाने वाढते? त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कृषी उत्पादने व ऊर्जा उत्पादने. कृषी उत्पादने म्हणजे सर्व अन्नधान्यांच्या किंमती आणि ऊर्जा उत्पादने म्हणजे वीज व खनिज तेलाच्या किंमती. वीज व खनिज तेलांच्या किंमती वाढल्या, की मालवाहतूक खर्च वाढतो, त्यामुळे अप्रत्यक्ष खर्च वाढतो परिणामी वस्तूंच्या किंमती वाढतात. कृषी उत्पादनांतूनच अनेक वस्तू निर्माण होत असल्याने एकंदरीत सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होते. मग या दोन उत्पादनांकडे आपण लक्ष दिले तर त्यावरुन सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, की घट होईल याचा अंदाज येऊ शकतो. अमेरिकी मध्यवर्ती बँकेचे (फेड) व्याजदर वाढले की लोक हाकाटी करतात पण लक्षात ठेवले पाहिजे की अमेरिकेत फेड व्याजदर वाढले, की जगात सर्वच बँकांना व्याजदर वाढवावे लागतात कारण परकी गुंतवणूकदारांनी जगात विविध देशांत ज्या काही डेट फंड किंवा सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली असते त्यांना फेडच्या वाढीनुसारच तेथेही व्याजदर वाढीव मिळणे अपेक्षित असते. म्हणजे फेडचा व्याजदर शून्य टक्के असताना तुमच्या देशात साडेपाच टक्के दर मिळत असेल तर फेडचा व्याजदर एक टक्का झाल्यावर तुमच्या देशातून साडेसहा टक्के व्याजदर मिळण्याची या गुंतवणूकदारांची अपेक्षा असते त्यामुळे त्या त्या देशांनाही आपले व्याजदर वाढवत जावे लागतात.
व्याजदर वाढले की चलनवाढ होणारच कारण व्याजदर हा भांडवलाचा प्रारंभिक खर्च आहे आणि तो वाढला की महागाई वाढणार. फेडचे व्याजदर वाढले तर जगभरात सोन्याला किंमत येणार असेल आता त्यातही उलट प्रमाण सांगितले जाते. अर्थशास्त्राची पुस्तके आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना यांत खूप फरक असतो. अर्थशास्त्राच्या पुस्तकात लिहीतात, की व्याजदर वाढले की लोकांचा बँकांच्या ठेवीकडे कल वाढेल मग ते इतर गुंतवणुकींपेक्षा बँकांत ठेवी ठेवतील आणि जास्तीचा व्याजदर कमावण्याचा प्रयत्न करतील. फेडचा सध्याचा व्याजदर बघितला तर तो गेल्या वर्षभरात शून्य टक्क्यांपासून पाच टक्क्यांपर्यंत वर गेला आणि सोन्याचा भाव प्रतिऔंस १७०० डॉलरपासून २००० डॉलरपर्यंत वर गेला. व्याजदर वाढवण्याची वेळ आली कारण त्यांना वाढलेली महागाई नियंत्रणात ठेवायची होती पण व्याजदर वाढवूनही महागाई नियंत्रणात येत नाही असे दिसल्यावर लोकांनी विचार केला की व्याजदराकडे लक्ष देण्यापेक्षा महागाईकडे लक्ष देणे जास्त योग्य ठरेल.
सध्या व्याजदर उच्चतम पातळीला आहेत. ते कमी कमी होत जाणार मग सोने पुन्हा वाढणार. म्हणून सध्याचे सोने तुम्हाला उच्चतम पातळीला वाटत असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, की सोन्यावरचे प्रतिकूल परिणाम गेले दीड वर्षे घडत होते आणि तरीही सोने वाढत होते. आता सोन्याच्या वाढीला पूरक असणाऱ्या गोष्टी पुढील वर्ष-दीड वर्षात घडणार असतील तर सोन्याचे दर आणखी वाढायची शक्यता आहे. वर्ष २००८ नंतर तब्बल १४ ते १५ वर्षांनी व्याजदर वाढले. मधल्या काळात व्याजदरवाढीचा प्रश्नच नव्हता. उलट संख्यात्मक विस्ताराबाबतच आपण ऐकत होतो. चलन बाजारात सोडायचे कशासाठी तर मागणी निर्माण होऊन रोजगार निर्मिती व्हावी, उद्योग चालावेत व त्यातून अर्थव्यवस्था चालावी यासाठी. नंतर हे संख्यात्मक विस्तार मागे घेण्यात आले. मग लोकांना वाटले आता चलनवाढ थांबेल पण तसे झाले नाही. संख्यात्मक विस्तार मागे घेतल्यावरही किंवा व्याजदर वाढत राहिल्यावरही सोने वाढत राहिले आणि आता त्याचे उलटे चक्र चालू होणार असेल आणि व्याजदर कमी होणार असतील तर सोन्याला वाढीला ते पूरकच आहे. आताच्या काळात तर भूराजकीय अनिश्चितता, महागाईची भीती आणि अचानक जगभरात येऊ शकणारी मंदी (सध्या जरी शेअरबाजार, व्याजदर, उत्पादनाची आकडेवारी याबाबत आपण तेजीच्या वातावरणात असलो तरी) यामुळे परिस्थिती उलट मार्गक्रमण करणार असेल, रोजगार निर्मिती कमी होणार असेल तर विक्रीतून किंमत पदरात पाडून घेण्यासाठी एकमेव गोष्ट असेल ती म्हणजे सोने. सोन्याच्या अनन्यसाधारण महत्त्वाला पर्याय नाही. जगभरातील मध्यवर्ती बँकांची आकडेवारी बघितली तर त्यांनी आधीच्या पाच-सहा वर्षांच्या तुलनेत वर्षभरात गेल्या वर्षभरात उच्चांकी सोनेखरेदी केली आहे. त्यांची खरेदी वाढते तेव्हा सोन्याच्या किंमतीही अचानक वाढतात याला किंमतीतील उसळी (प्राईस जर्क) म्हटले जाते. नेमक्या याचवेळी आपण प्रवेश केला तर आपल्याला काही काळासाठी वाटू शकते, की आपण प्रवेश केल्यानंतर घसरण झाली, पण लक्षात ठेवले पाहिजे, की बड्या खरेदीदारांचा अभ्यास आपल्यापेक्षाही सखोल असतो. त्यांनी केलेली सोनेखरेदी ही दीर्घकालीन वाढ नजरेसमोर ठेऊनच केलेली असते.
गेल्या एक-दोन महिन्याच्या काळात अमेरिकेच्या एसपीडीआर या गोल्ड इटीएफमध्ये अचानकपणे खरेदीची वाढ दिसून आली म्हणजे वाढीव भावात वाढ दिसून आली, हे जास्त अधोरेखित करण्यासारखे आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना त्यात कुठेतरी संधी वाटतीय, भाववाढीची शक्यता वाटतेय. त्यामुळे सोन्याचे भाव घटले तरी मर्यादित काळापुरते ते १७३० ते १७८० डॉलर प्रतिऔंसपर्यंत किंवा भारतीय चलनात विचार करायचा झाला तर साधारणपणे ५४,००० ते ५५,००० प्रति १० ग्रॅम या पातळीला येऊ शकतात. अशावेळी सोने खूप खाली येईल आणि पूर्वीच्या ४०,००० रुपये प्रति १० ग्रॅम भावाने मिळेल, या आशेवर कुणी विसंबून अथवा थांबून राहू नये. दुसरीकडे ५५,००० रुपये प्रति १० ग्रॅम भावाने खरेदी करुन मी काही चूक केली का, अशा विचाराने पटकन् निघून जाण्याचीही गरज नाही. सोने आगामी काळात वाढतच राहील. अनेक जागतिक घडामोडी असतात ज्यामध्ये एम्प्लॉयमेंट डाटा असतो, पीएमआय डाटा असतो, फेड रिझर्व्हचे दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे मिनीट्स असतात, त्यावरील दिलेले भाष्य असते, कधी येलेन व पॉवेल एकमेकांविरुद्ध विधाने करतात त्यामुळे बाजारात तेजी अथवा मंदी निर्माण होऊ शकते. आपण या अल्पकालीन घडामोडींकडे लक्ष न देता बँकेत मिळणारा जो व्याजदर आहे त्याच्यापेक्षा जास्त परतावा आपल्याला सोन्यात काही वर्षांनी मिळणार आहे का, असा दीर्घकालीन विचार करावा व सोन्यात गुंतवणूक करावी.
माझा जो पूर्वीचा अनुभव आहे किंवा गेल्या २५-३० वर्षांचा सांख्यिकी अभ्यास आहे त्यानुसार चक्रवाढ व्याजदरानेही विचार केला, पाच ते सहा टक्के जोखीममुक्त परताव्याचा विचार केला तर कुणालाही बँका किंवा बाँडमधील गुंतवणुकीपेक्षा सोन्यामध्ये निश्चितच जास्त परतावा मिळालेला असेल आणि तो अबाधित असणार आहे आणि तो अर्ध्या रात्रीही वटवता येणारा असेल. बाजाराला सुटी होती म्हणून सराफ सोने परत घ्यायला थांबत नाही, बाजार खूप तापलेला होता म्हणून तो नाकारत नाही, बाजार खूप मंदीत गेला होता म्हणून तो विकायला नाकारत नाही. त्यामुळे दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस आणि वर्षाचे बाराही महिने रोकडसुलभ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे सोने. कारण शेवटी सोने हे अक्षय आहे.
(लेखक प्रसिद्ध कमोडिटीतज्ज्ञ; तसेच पीएनजी अँड सन्सचे सीईओ आहेत.)