अमित मोडक
सोन्याने 2006 पासून गुंतवणूकदारांना खूपच सुखाऊन टाकले आहे. कारण त्या आधी सुमारे दहा वर्षे सोन्याचे भाव हे भारतीय मूल्यात प्रति दहा ग्रॅम 3500 ते 4800 रुपये या भावपातळीदरम्यान होते. त्याचा परिणाम म्हणजे अनेकांना सोने, हे अर्थशास्त्रज्ञांच्या मते जशी डेड गुंतवणूक आहे, तशीच प्रत्यक्षातही ती डेड गुंतवणूक वाटू लागली होती. मात्र, 2006 नंतर सोन्याच्या भावात मोठी वध-घट सुरू झाली आणि त्याला अजाणतेपणी भारतातील अनेकांनी एमसीएक्स सुरू झाल्याने हा केवळ सट्टेबाजीचा परिणाम आहे, असे म्हणून सोडून दिले होते. प्रत्यक्षात सोन्याचे व्यवहारातील बारकावे दुर्लक्षिले होते.
अन् गुंतवणूक सोन्याकडे वळली
वर्ष 2008 पासून सोने भावात पुढील चार वर्षे सतत वाढ होत गेली व सोन्याचे प्रति औंस आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव 800 डॉलरपासून 1920 डॉलरपर्यंत वाढले. याला सोन्याचे स्वतःचे असणारे विशेष गुणधर्म याचबरोबरीने 2008 च्या आर्थिक संकटामुळे विविध बँकांनी औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांना मदत म्हणून जाहीर केलेल्या सवलतींमुळे निर्माण झालेली जास्तीची रोकड सुलभताही कारणीभूत होती. मध्यवर्ती बँकांनी औद्योगिक व आर्थिक क्षेत्राच्या मदतीसाठी विविध उपाययोजनांमार्फत रोकड सुलभता उपलब्ध केली. मात्र, प्रत्यक्षात आर्थिक किंवा औद्योगिक क्षेत्रात आकर्षक संधी उपलब्ध नसल्याने ही रोकड सुलभता सेफ हेव्हन पार्किंगच्या नावाखाली सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळली.
परकी गंगाजळीला पर्याय?
सध्याच्या स्थितीतदेखील अनेक युरोपीय अर्थव्यवस्थांनी व अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेने कोरोना व औद्योगिक मंदी यासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्यामधून पुन्हाएकदा मोठ्याप्रमाणावर रोकड सुलभता बाजारात उपलब्ध झाली आहे. याही वेळेस सोने खरेदी हाच आकर्षक पर्याय या रोकड सुलभतेच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे व त्याचे परिणाम आपण सध्या सोन्यात येत असलेल्या तेजीच्या माध्यमातून पाहात आहोत. सोने हे खरोखरच चलनाला पर्याय आहे. कारण सोन्याचे भाव हे सँडर्डाईज डॉलरच्या किमतीत सांगितले जातात व प्रत्येकच देश आपापल्या चलनात ते परिवर्तीत करून घेतो. म्हणजेच सोने हे देशातील कुठल्याही चलनाशी हस्तांतरित होऊ शकते. त्यामुळे केवळ डॉलरच असे नाही तर आपल्याला सोईचे होईल, असे कोणतेही चलन आपण सोन्याच्या बदल्यात मिळवू शकतो. परंतू, प्रत्येक चलन हे वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांना एक्स्पोजेबल (असुक्षित) असते. त्यामुळे कित्येक देश हे विविध चलनातील परकी गंगाजळीचे साठे सोन्यामध्ये रुपांतरित करून ठेऊ इच्छिततात. त्यामुळे अनेकदा जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास मध्यवर्ती बँकांकडून त्यांच्याकडची परकी गंगाजळी ही परकी चलनाचे धोके टाळण्यासाठी काहीप्रमाणात सोन्यात गुंतविली जाते. अशावेळेस सोन्याची मागणी काही काळासाठी अचानक वाढते व त्या काळात सोन्याचे भाव हे असाधारणपणे वाढतात.
रुपया घसरल्याने सोने स्थिर
वर्ष 2008-12 या काळात आर्थिक सवलती या वेगवेगळ्या मध्यवर्ती बँका देत होत्या आणि त्याचा परिणाम सोने भाववाढीवर दिसला तर 2012 ते 2016 या काळात अमेरिकेतील अर्थव्यवस्था व जगातील सर्वच अर्थव्यवस्था या औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपर स्थिरावू लागल्या आणि त्यामुळे 2008-12 दरम्यान दिलेल्या आर्थिक सवलती या टप्प्याटप्प्याने काढून घेतल्या गेल्या. तसेच, त्यामुळे रोकड सुलभता कमी होत गेली. परिणामी सोन्यातील मोठ्या प्रमाणावरील खरेदी कमी होत गेली व त्याचा अंतिमतः परिणाम म्हणजे आपण 2013-16 या काळात सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे 40 टक्क्याने घसरलेल्या पाहिल्या. भारतात त्या कालावधीत सोने हे घटले नाही. मात्र, स्थिर राहिले याचे कारण भारतातील वाढलेला आयात कर व भारतीय रुपयाचे घसरलेले मूल्य हे कारणीभूत होते.
विनिमय मूल्य महत्त्वाचे
सध्याच्या स्थितीत जेव्हा जागितक पातळीवर सोने वाढत आहे त्यावेळेस भारतातही सोने वाढत आहे. मात्र, फरक हा आहे, की जागतिक स्तरावर सोने अद्यापही सर्वोच्च भावापेक्षा जवळपास 15 टक्के खाली आहे. परंतु, भारतात मात्र 2012-13 तील सर्वोच्च 33,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या भावपातळीपेक्षा 50 टक्क्याने सोने वरती आहे. याचेही प्रमुख कारण म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून वर्षानुर्षे वाढत असलेला आयात कर व सततच घसरत असलेला भारतीय रुपया आहे. भारतीय रुपयाचा सोने भावाशी असणारा संबंध हा प्रति 1 पैसा डॉलरचे घटणारे किंवा वाढणारे मूल्य हे सोन्याचा भाव सहा रुपये प्रति दहा ग्रॅम वाढविते किंवा घटविते. डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया सध्या विक्रमी नीचांकी पातळीवर आहे आणि त्यामुळे सोन्याच्या भावावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
भूराजकीय, आपत्कालीन स्थितीचा परिणाम
इराणणे अमेरिकन दूतावासावर केलेल्या हल्ल्यांपासून सोने हे 1700 डॉलर प्रति औंसच्या पुढे व्यापार करू लागले आहे. अनेकदा त्यात वध-घट होत असते. तशीच घट 20-23 मार्च 2020 दरम्यान दिसून आली. जेव्हा सोन्याचे भाव 1460 डॉलर प्रति औंसपर्यंत घटले त्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनामुळे जगातील सर्व आर्थिक बाजारांमध्ये व क्रूड भावात आलेली मंदी तसेच, त्या मंदीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या तेजीच्या सौद्यांची पूर्तता करण्यासाठी द्यावी लागणारी मोठ्या रकमेची निकड ही होती. त्यासाठी अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यांची सोन्यातील गुंतवणूक विकून पैसे उभे केले आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्यात विक्रीचा दबाव आला व काही काळापुरती त्यामध्ये मोठी घसरण दिसली. मात्र, अशाश्वत काळात गुंतवणूकदारांची पसंती पुन्हाएकदा सोन्याला मिळाली. त्यामुळेच जगातील विविध आर्थिक बाजार 22 मार्च ते 10 एप्रिल या दरम्यान 20 टक्क्यांनी घटले तर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणजे सोने हे वीस टक्क्याने वधारले. परिणामी, पुन्हाएकदा सोने हाच सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्याचे अधोरेखित झाले.
कल सध्या वाढीचाच
सध्याचा स्थितीत सोने जागतिक पातळीवर पुन्हाएकदा 1920 डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे भारताचा रुपया आणखी कमकूवत होण्याची शक्यता आहे. तात्पर्य जागतिक पातळीवर सोने 1950 डॉलर प्रति औंस पुढील काही काळात पोचू शकते. भारतात 77 रुपये प्रति डॉलर हा चलनदर राहिल्यास सोने 50,500 ते 52 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर जाऊ शकते. सोन्यात होणारी प्रत्येक घट ही गुंतवणुकीची संधी मानण्यास हरकत नाही. गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर डॉलर किमतीत सोन्याने सुमारे 25 टक्क्यांपेक्षा अधिक, भारतीय रुपयाच्या मूल्यात सुमारे 40 टक्के परतावा दिला आहे.
गुंतवणुकीचा नवा नियम?
गेल्या 13 ते 14 वर्षांतील कालावधीत जागतिक स्तरावर डॉलर मूल्यात वार्षिक साडेनऊ टक्के, भारतीय रुपयाच्या मूल्यात वार्षिक 14 टक्के एवढा परतावा सोन्याने दिला आहे. हा परतावा पाहता गुंतवणुकीची व्याख्या बदलल्याचे जाणवत आहे. आता सुरक्षित गुंतवणूक (सोने) जास्त परतावा तर असुक्षित गुंतवणूक (शेअर बाजार) कमी परतावा, असा नवा आर्थिक नियम झाल्यासारखे वाटू शकेल. 2008-12 दरम्यान घटलेले शेअर बाजार पुन्हा वेगाने वाढले. मात्र, त्यावेळेस सोने मात्र घटले नाही. हीच परिस्थिती याही वेळेस दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
(लेखक पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे (पीएनजी सन्स) संचालक-साईओ आहेत.)
सोन्याने 2006 पासून गुंतवणूकदारांना खूपच सुखाऊन टाकले आहे. कारण त्या आधी सुमारे दहा वर्षे सोन्याचे भाव हे भारतीय मूल्यात प्रति दहा ग्रॅम 3500 ते 4800 रुपये या भावपातळीदरम्यान होते. त्याचा परिणाम म्हणजे अनेकांना सोने, हे अर्थशास्त्रज्ञांच्या मते जशी डेड गुंतवणूक आहे, तशीच प्रत्यक्षातही ती डेड गुंतवणूक वाटू लागली होती. मात्र, 2006 नंतर सोन्याच्या भावात मोठी वध-घट सुरू झाली आणि त्याला अजाणतेपणी भारतातील अनेकांनी एमसीएक्स सुरू झाल्याने हा केवळ सट्टेबाजीचा परिणाम आहे, असे म्हणून सोडून दिले होते. प्रत्यक्षात सोन्याचे व्यवहारातील बारकावे दुर्लक्षिले होते.
WhatsApp us